महूद, ता. २६ : कोणत्याही सभागृहातील लोकप्रतिनिधी निवडताना उमेदवाराची जात,पाहुणे असे न पाहता त्याचे ज्ञान,शिक्षण,काम करण्याची कुवत पाहूनच मतदान करावे- माजी सरपंच भास्करराव पेरे.
महूद, ता. २६ : कोणत्याही सभागृहातील लोकप्रतिनिधी निवडताना उमेदवाराची जात,पाहुणे असे न पाहता त्याचे ज्ञान,शिक्षण,काम करण्याची कुवत पाहूनच मतदान करावे- माजी सरपंच भास्करराव पेरे.
गावाकडच्या बातम्या
महूद प्रतिनिधी
देशात चांगले राज्यकर्ते निर्माण झाले तरच देश चांगला होईल असे विचार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पाटोदा येथील आदर्श ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी महूद येथे बोलताना व्यक्त केले.
येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश थोरात,सागर साबळे,नवनाथ सरतापे, विजय पवार,असिफ तांबोळी,दिलीप केसकर,महेंद्र खांडेकर,योगेश थोरात आदी युवक आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात माजी सरपंच पेरे- पाटील हे बोलत होते.
यावेळी माजी सरपंच भास्कर पेरे-पाटील यांच्या हस्ते महूद अंतर्गत येणाऱ्या केसकरवस्ती येथील महिला व युवकांसाठीच्या रोजगार प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.युवकांच्या पुढाकाराने गावात लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही योजनेचे लोकार्पणही माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच युवकांच्या वतीने उभारण्यात आलेल्या सामाजिक जनसंपर्क कार्यालयाचे उद् घाटनही करण्यात आले.
या कार्यक्रमास उद्योगपती चंद्रशेखर ताटे,बाळासाहेब इनामदार,माजी सरपंच बाळासाहेब ढाळे,दिलीप नागणे,उत्तम खांडेकर,जितेंद्र बाजारे,मोहन जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना माजी सरपंच श्री.पेरे-पाटील पुढे म्हणाले की, चांगले काम करण्यासाठी पदच पाहिजे असे नाही. गावचा विकास गाडा पुढे नेण्यासाठी साम,दाम,दंड,भेद अशा सर्वच मार्गांचा अवलंब करून लोककल्याणच केले पाहिजे. मात्र कोणतेही काम मी केले व मला त्याचे फळ मिळालेच पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे. फळाची अपेक्षा केल्यास दुःख वाट्याला येते. त्यामुळे चांगले करता आले पाहिजे व ते वेळीच सोडून देत आहे आले पाहिजे. परमेश्वराने दिलेल्या गोष्टींमध्ये समाधान मानले पाहिजे.
चौकट - साधने वाढली मात्र आयुष्यमान कमी झाले
पूर्वीपेक्षा मानवी सुखाची असंख्य साधने वाढलेली आहेत. आरोग्य सुविधा वाढल्या आहेत. असे असले तरी माणसाचे सरासरी आयुष्यमान कमी होऊ लागले आहे. त्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी प्यावे, गावांमध्ये फळांची झाडे लावावीत, गाव स्वच्छ ठेवावा, मुलांना शिक्षण व संस्कार द्यावेत, बाहेरचे खाऊ नये, वयस्कर व्यक्तींशी गोड बोलावे, दुसऱ्यांवर जळू नये.या मार्गांचा अवलंब केल्यास मानवाचे आयुष्य पुन्हा शंभर वर्षे होईल.-भास्करराव पेरे-पाटील
चौकट दोन - मतदानासाठी पैसे घेतल्याने देशाचे वाटोळे
देशाचे वाटोळे होण्याचे एकमेव कारण म्हणजे मतदानासाठी पैसे घेणे हे होय. जोपर्यंत पैसे घेण्याचे बंद होणार नाही तोपर्यंत नागरिकांना आपल्या अधिकाराची जाणीव होणार नाही. त्यांच्यामध्ये नैतिकतेची ताकद निर्माण होणार नाही.या ताकतीच्या जोरावरच आपण व्यवस्था बदलू शकतो.-भास्करराव पेरे-पाटील
चौकट तीन -युवकांच्या पुढाकाराने गावात सीसीटीव्ही
महूद येथे तरुणांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून सीसीटीव्ही योजना कार्यान्वित करण्यात येत आहे.यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.लोक वर्गणीतून गावातील मुख्य चौक,बाजार पटांगण,येथील सर्व शाळा परिसर, संभाजी चौक ,मज्जिद व गणपती मंदिर,मारुती मंदिर,भीमनगर अशा बारा ठिकाणी ३४ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.याचे डाटा संकलन ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येणार आहे.यामुळे गावातील गुंडगिरी,रोड रोमिओ, चोऱ्या आदी गोष्टींवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.यातील पहिल्या टप्प्यातचे लोकार्पण माजी सरपंच भास्कर पेरे-पाटील यांच्या हस्ते झाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा