आई वडिलांनी घालून दिलेला आध्यात्मिक संस्कार शेवटच्या श्वासापर्यंत प्राणपणाने जपणार ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा संकल्प

 आई वडिलांनी घालून दिलेला आध्यात्मिक संस्कार शेवटच्या श्वासापर्यंत प्राणपणाने जपणार ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा संकल्प 



स्व. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या जयंतीदिनी अध्यात्मनगरी दुमदुमली


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 


स्व आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी राजकारणातून आणि आई स्व शारदादेवी (काकी) साळुंखे पाटील यांनी अध्यात्मातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचा सेवाभावी अध्यात्मिक संस्कार दिला आहे हा संस्कार शेवटच्या श्वासापर्यंत प्राणपणाने जपणार असा निर्धार माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. बुधवार दि ३१ डिसेंबर रोजी भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या जयंतीदिनी त्यांनी हा संकल्प केला. 

आपल्या आईच्या जयंतीचे औचित्याने बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आगामी काळात स्व आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि स्व शंकुतलादेवी साळुंखे पाटील तसेच भागवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मरणार्थ अध्यात्मनगरी जवळा येथे तब्बल ५ एकर परिसरात गोर गरिबांच्या मुलामुलींची मोफत लग्न करण्यासाठी मंगल कार्यालय, महिला बचत गटातील एक हजार महिलांना कच्चा माल तयार करण्यासाठी सभागृह, तसेच तालुक्यातील तरुणांना माती आणि मॅट अशा दोन्ही प्रकारात दर्जेदार कुस्ती प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा संकुल आणि ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त अशी अभ्यासिका सुरू करणार असल्याचे सांगितले आणि भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या नावाने आळंदी ते पंढरपूर अशी पालखी सुरू करणार असल्याचा संकल्पही यावेळी त्यांनी केला

सांगोला तालुक्याचे स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या धर्मपत्नी आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मातोश्री भागवत भक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या ८४ व्या जयंती निम्मित अवघी अध्यात्मनगरी जवळा ता. सांगोला परिसर दुमदुमून गेला होता. स्व काकींच्या स्मरणार्थ माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पत्नी रेखाताई पाटील, स्व. सुभाषनाना पाटील यांच्या पत्नी वृषाली (नानी) पाटील, विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी डॉ. निकिता देशमुख, आणि डॉ आस्था अनिकेत देशमुख यांच्यासह सर्वच राजकीय पक्ष आणि नेतेमंडळींच्या कुटुंबियांनी महिलांनी एकत्रित येऊन सर्वांच्याहस्ते "शारदाई वात्सल्यधाम" आलेगाव रोड, जवळा येथील समाधीस्थळावर पारिजातकाचे झाड लावले आणि सांगोला तालुक्याचे अनोख्या एकतेचे दर्शन घडवून दिले. 

सांगोला तालुक्याच्या अध्यात्मिक परंपरेत अनन्य सधारण योगदान असणाऱ्या स्वर्गीय शारदादेवी काकी साळुंखे पाटील यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त जवळा ता सांगोला येथे गाव परिसरात सकाळी ९.३० पासून भजन कीर्तन बालदिंडी तसेच तालुक्यातील असंख्य भजनी मंडळांनी केलेल्या प्रभात फेरीमुळे वातावरण अध्यात्मिक बनले होते. गाव परिसरातून स्व काकासाहेब साळुंखे पाटील स्व शारदादेवी साळुंखे पाटील आणि स्व शंकुतलादेवी साळुंखे पाटील यांच्या पादुकाची पालखी शारदाई वात्सल्यधाम आलेगाव रोड जवळा येथे आणण्यात आली. यावेळी स्व. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या जयंतींच्या औचित्याने येथील समाधीस्थळावर स्व. काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या ११ परतवंडाच्या हस्ते पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. सांगोला शहर आणि तालुक्यातील साळुंखे पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी जयंतीदिनी स्व शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. 


चौकट ; 


१) आई वडिलांची सेवा करणारा "आधुनिक युगातील भक्त पुंडलिक" म्हणजे दिपकआबा


माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या मातोश्री भागवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांची केलेली मातृसेवा संपूर्ण तालुक्याने पहिली आहे. आपल्या आई आणि वडिलांच्या निधनानंतरही त्यांच्या विचारकांची आणि संस्काराची पालखी अविरतपणे घेऊन जाण्याचा त्यांनी संकल्प केल्याने आई वडिलांची सेवा करणारा "आधुनिक युगातील भक्त पुंडलिक" म्हणून या जयंती सोहळ्यात उपस्थित ह.भ.प. डॉ बिरा बंडगर महाराज यांनी त्यांचा उल्लेख केला. 


२) स्व शारदादेवी काकीच्या आठवणींना उजाळा


भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांनी कधीच जातीपातीला आणि राजकीय भूमिकांना थारा दिला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी अध्यात्म आणि समाजसेवेचे कार्य पार पाडले त्यांंनी केलेले कार्य अमर राहील असा विश्वास उपस्थित महिलांनी व्यक्त केला. त्याचबरोबर या जयंतीदिनी उपस्थित असणाऱ्या अनेक महिलांनी शारदादेवी काकीच्या आठवणींना उजाळा दिला.

 


फोटो ;

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण